मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे
का होते बेभान कसे गहिवरते..
पण आताशा या उधाण मनाला सावरायला शिकतेय मी.. नको असलेल्या गोष्टींशी भांडण्यापेक्षा तिथून दूर निघून जाणं केव्हाही चांगलंच हे जाणवतंय.. नको असलेली नातीही तोडण्यात काही गैर वाटत नाहीये कारण सतत मनस्ताप करून घेण्यापेक्षा अलिप्त राहणं हे समजदारपणाचं लक्षण आहे असं वाटतंय.. दुसऱ्यांना खुश करून मन मारून जगण्यापेक्षा स्वतः ला हवं ते करायला मजा येतेय..
बोलता तर मलाही येतंय पण काही ठिकाणी शांत राहणं हेच अधिक हिताचं आहे हे उमगतंय.. कुणाच्याही मागे धावण्यापेक्षा एकटं राहिलं की समाधान वाटतंय.. स्वतः च्या गरजा स्वतःच पूर्ण करताना अभिमानही वाटतोय.. कुणीतरी येऊन माझं आयुष्य बदलेल आणि मला खुश ठेवेल यापेक्षा मी कशी खुश राहील हे महत्त्वाचं वाटतंय..
थोडं थोडं का होईना, पण रोज काहीतरी नवीन शिकायला मिळतंय..
आपल्या पडत्या काळात कोण आपल्या जवळ होतं हे पाहणं जरी त्रासदायक असलं तरी खरंच कोण आपलं आहे हे पाहून सुखद अनुभव येतोय.. आता कोणाला दुखवायचं नाहीये.. पण कोणी सहज आपल्याला दुखवेल इतकंही वेडं राहायचं नाहीये.. तक्रारी तर मुळीच करायच्या नाहीयेत, कारण मला जे मिळालंय तेवढंही कधी कधी एखाद्याला मिळत नाय.. पैशांनी मोजता येणारं सुख मला नकोय.. मला फक्त तेच हवंय जे फक्त माझं असेल..
नात्यांचा पसारा जमा करायचाच नाहीये मुळी मला, फक्त माझी हक्काची माणसं हवीयेत.. खोट्या नात्यांत आणि जगात वावरायचंच नाहीये मला, कारण मी माझ्या जगात सुखीये.. इतकंही अवघड नाहीये माझ्या जगात येणं.. फक्त समोरच्यात खरेपणा आणि हिंमत असायला हवीये.. मला माहितीये थोडं महाग आहे माझ्यासोबत जगणं, पण सक्ती कुणालाच नाहीये.. मला जिंकायचं नाहीचेय कुणाविरुद्ध, मला फक्त माहितीये मी हरणार नाहीये.. मी हरणार नाहीये..
- प्राची सुलक्षणा अनिल
(लेखिका बालहक्क चळवळीतील सक्रीय कार्यकर्त्या आहेत)