काल टीव्हीवर दूधाचे अनुदान वाढवून मिळावे म्हणून एका पक्षाने आंदोलन केले. दूधाचे कॅन चक्क रस्त्यावर ओतले. अर्थात कुणी कसं आंदोलन करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सारेच सुशिक्षित (?) आहेत. त्यामुळे आपण कुणाला काय शिकवावं ? लोकशाहीमध्ये कुणीही काहीही बोलेल.. करेल.. असो. मला मात्र ते पाहताना श्रावणात सोमवारी वाचलेली ती खुलभर दुधाची कहाणी आठवली.
आटपाट नगराचा राजा शंकराला अभिषेक घालण्यासाठी सा-या शहराला हूकूम देतो. आपआपल्या घरातील दूध त्या गाभाऱ्यात आणून ओतावे..! आता राजाचाच हुकूम तो. सारी जनता दूध आणून घालते. गाभारा काही भरत नाही. गावात एक आजी आपल्या भरल्या कुंटूबासह रहात असते. ती सकाळी उठून शुचिर्भूत होते. मुला नातवंडाना, लेकीसुनांना रोजच्या प्रमाणे दूध प्यायला लावते. देवपूजा करते. तिच्या घरात आता खुलभर (फुलपात्रभर) दूध उरतं. ते ती मंदिरात नेते अन गाभाऱ्यात ओतते. तर काय आश्चर्य ! गाभारा भरतो.
सकाळपासून न भरलेला गाभारा आता म्हातारीने दूध ओतल्यावर भरला, ही बातमी राजाच्या कानावर जाते. राजा म्हातारीला दरबारी बोलावून विचारतो. "आजी आपण काय केलत ? आपण दूध घातल्यावर गाभारा भरला" आजी म्हणते, "महाराज, माझ्या भुकेल्यांना मी दूध प्यायला दिलं. उरलेलं खुलभर दूध महादेवाला वाहिलं, भुकेल्यांना तृप्त केले तीच सेवा महादेवाने गोड मानून घेतली" आजीच्या बोलण्याने राजाला तर त्याची चूक कळली.
पण आमच्या वटेश्वर महादेव आणि इतर मंदिराच्या समोर भरलेल्या दुधाच्या पिशव्या घेऊन भक्त उभे असतात.
पिंडीवर त्या दूधाचा अभिषेक घालायचा. मला हे दृश्य फारच उद्वेगजनक वाटायचं ! ईश्वरावरील आस्था ही वेगवेगळी गोष्ट आहे. पण सारासार विवेक आतातरी पाहिला पाहिजे. कृतार्थ व्हावं अस माणूसपण जपण्यासाठी आतातरी आपल्याला जाग यायला हवीच ना..! आणि दुसऱ्या कुणीतरी दूधाने गाभारे भरेल म्हणून आपण दूध म्हणून गाभाऱ्यात पाणी टाकणं टाळायला हवं.
या अशा श्रावणातल्या कथा कधी न पटणा-या. पण खुलभर दुधासारख्या कहाण्या मनाला भावून जाणाऱ्या.. पहा कुणी लिहल्या कुणास ठाऊक ? पण आपल्या संस्कृतीची ही मौखिक परंपरा अशीच पुढे गेली पाहिजे ! फक्त विवेकाची दिशा धरुन. बस्स इतकच..!!
© स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या व कवयित्री आहेत)