माणूस, कला आणि निसर्ग

माणूस, कला आणि निसर्ग हे तिघं म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी अवस्था. तिघांनी कितीही वेगळं असण्याचा, दर्शवण्याचा प्रयत्न केला तरी हे तिघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. माणूस रममाण होतो तो कलेत, निसर्गात, कला सुखावते ती माणसालाच आणि निसर्ग पोसतो तो ह्या दोघांनाच. माणसाची आणि कलेची नाळ जोडलेली आहे निसर्गाशी. दोघांनाही काहीतरी करण्याची, घडवण्याची प्रेरणा आणि त्यासाठी त्यांना लागणारं साहित्य हे त्यांना निसर्गच देतो.


ते गुंतलेत एकमेकात, इतके की आता त्यांनी स्वतः जरी वेगळं व्हायचा प्रयत्न केला तरी ते नाही जमणार. त्यांचं रूप वेगळं असलं तरी त्यांचा आत्मा एक आहे आणि म्हणून त्यांना वेगळं पाहणं सुद्धा आता शक्य नाहीये, करणं तर दूरची गोष्ट.. कला काय, निसर्ग काय किंवा अगदी माणूस काय, सगळेच एकाच गोष्टीचे घटक आहेत. त्यांचा आदी आणि अंत एकच आहेत. 

माणूस पंचमहाभूतांची मूर्ती आहे, निसर्ग त्या पंचमहाभूतांचा पालक, आणि कला ही त्यांची निर्मिती. त्यांचा ह्या भूतलावर येण्याचा काळ वेगवेगळा असला तरी आहेत ते एकाच गोष्टीचे घटक. निसर्ग माणसाला कलेची प्रेरणा न जाणे कित्येक युगं देत आलीये. ती प्रेरणा घेऊन माणूस कलेचा व्यासंग वाढवत इथवर पोहोचलाय, कला जरी दगडावरून आता कॅनव्हास वर आलीये, तिचं स्वरूपही बदललंय पण तिची प्रेरणा आजही तीच आहे..

हे तीन घटक वेगळे नव्हतेच कधी, आपण फक्त त्यांना नावं दिलीत.. हे तिघंही प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष रुपात पंच महाभूतांचीच देण आहे. निसर्ग बनलाय पंचमहाभूतांनी, माणूस घडलाय पंचमहाभूतांनी आणि कला, कला जरी सरळ सरळ पंचमहाभूतांनी बनलेली नसली तरी त्याची प्रेरणा त्यांचंपासूनच आलीये जसं राग हा अग्नी पासून तर प्रेम वाऱ्या पासून, असे रस ह्या पंचमहाभूतांनी कलेला दिलेत. 

एकत्र ते पूर्ण आहेत आणि एकेकटे अपूर्ण. ह्यातला कुठलाच घटक एकटा जगू शकत नाही. हे परावलंबीपण त्यांना एकत्र जगवतं. हे असं वेगळं असूनही एकत्र राहणं आपल्याला जमेल??

- शामली विजय दिपाली
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !