अहमदनगर - येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचा कोरोना बाधीत असल्याचा अहवाल आला असल्याच्या बातम्या सोशल मिडियावर आल्या होत्या. परंतु, हे सगळं चुकीचं असल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालयातील एका डॉक्टरांना सांगावे लागले आहे. त्यांनी हे सांगताना सोशल मिडियावर अशा अफवा पसरवणाऱ्यांवर प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
"आपण कोरोना बाधीत असल्याबाबत काही ठिकाणी चुकीच्या बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. हे अतिशय दुर्दैवी आणि कोणतीही खातरजमा न करता केलेले कृत्य आहे. याबाबत कोणीही माझ्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती जाणून न घेता एकतर्फी आणि चुकीच्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमाातून प्रसारित केल्या, असे स्पष्टीकरण येथील या डॉक्टरांनी दिले आहे.
अशा कोणत्याही खोट्या गोष्टीवर अथवा अफवांवर कोणीही विश्वास ठेऊ नये,' असे आवाहन देखील या डॉक्टरांनी केले आहे. एखाद्या व्यक्तीचे नाव घेऊन अशा प्रकारे माहिती प्रसारित करणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ही गोष्ट चुकीचीच नाही, तर अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीचे नाव कोरोनाबाधित असल्याचे सांगणे हाही फौजदारी स्वरुपाचा गुन्हा असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.