'ब्रीद: इन टू द शैडोज'चा तिसरा सीजन कधी ?
त्या 'चिठ्ठी'ची उत्सुकता पोचलीय शिगेला
या वेब सिरीजच्या पहिल्या सीझनमध्ये मॅडी उर्फ आर. माधवन याने आपल्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली होती. परंतु, त्याहूनही या सिरीजचा दुसरा भाग म्हणजेच सीझन दोन अधिक चर्चेत राहिला आहे. बारा भागांच्या या क्राइम थ्रिलर ड्रामाने प्रेक्षक आणि समीक्षकांचे अफाट कौतुक मिळवले आहे. या रोमांचक मनोवैज्ञानिक क्राइम थ्रिलर सोबत बॉलीवुडचा सुपरस्टार अभिषेक बच्चनही पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे.
ब्रीदच्या दुसऱ्या सीझनमध्ये अभिषेकने साकारलेल्या भूमिकेचे सर्वांनी तोंडभरुन कौतुक केले आहे. विशेष म्हणजे दुसरा सीझन आधीच्या सीझनसारखा एका पॉईंटवर येऊन थांबलेला नाही. अखेरच्या सीनमध्ये अभिषेक एका अभिनेत्रीच्या हातात एक चिठ्ठी देतो. त्यात सी-१६ असे लिहिलेले आहे. याचा नेमका अर्थ काय? हे अनेकांना उलगडलेले नाही. त्यामुळे या सिरीजचा तिसरा सीझन कधी येणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.
नुकतेच अभिषेक बच्चनने आपल्या सोशल मीडियावर एक ट्वीट केले आहे. त्यानंतर प्रेक्षकांमध्ये पुन्हा एकदा उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. या मालिकेसोबत अभिनेता अमित साध पुन्हा एकदा वरिष्ठ निरीक्षक कबीर सावंत या आपल्या पुरस्कार प्राप्त भूमिकेत दिसणार आहे. तर सोबतच निथ्या मेनन आणि सैयामी खेर यादेखील प्रमुख भूमिकेत आहेत. आता प्रेक्षकांना पुढच्या सीझनची प्रचंड उत्सुकता लागलेली आहे.